The Divine Importance of Ashtavinayak Yatra

*१)मोरगाव मयुरेश्वर :* सिंदुरासुर नावाच्या राक्षसाने त्रैलोक्यावर विजय मिळवला.त्याने आपल्या पराक्रमाने विष्णूला सुद्धा त्रस्त केले .त्याच्या नाशासाठी गणपतीने हा अवतार घेतला.गणपतीच वाहन उंदीर आहे.पण ह्या अवतारात त्याने मोर हे वाहन निवडलं होत.त्यामुळे त्याला मयुरेश्वर हे नाव पडलं.

गणपतीची उपासना करणाऱ्या संप्रदायाला गाणपत्य म्हणतात.*मोरगाव हे गाणपत्य संप्रदायाच अद्यपीठ आहे*. गणपतीचा दिव्य लोक स्वानंद भुवन आहे. मोरगाव हे भू स्वानंदभुवन म्हणुन ओळखले जाते.

ह्या गणपतीची अजुन एक अद्भुत कथा आहे.*समर्थ रामदास स्वामी* कुठल्याही देवळात गेले तरी त्यांना देवाच्या ठिकाणी श्रीरामाचीच मूर्ती देवाच्या ठिकाणी दिसायची. पण ह्या ठिकाणी मात्र त्यांना गणपतीच दिसला. त्यामुळे त्यांनी उत्स्फूर्तपणे सुखकर्ता दुखहर्ता ही आरती रचली. तिच सर्व महाराष्ट्रभर गायली जाते.

हा गणपती पुणे जिल्ह्यात आहे.

3)सिद्धिविनायक सिद्धटेक

पूर्वी मधु आणि कैटभ अशा दोन राक्षसांनी त्रैलोक्यात उत्पात माजवला होता. त्यामुळे सगळे देव ऋषी मनुष्य जीवजंतू त्रस्त झाले. त्यामुळे संतापाने विष्णूने त्यांच्याशी युद्ध सुरू केले. हे युद्ध 5000 वर्षे चालले तरीही राक्षस काही मरेनात. त्यावर चकित होऊन विष्णूने उपाय म्हणुन भीमा नदीतल्या टेका वर (लहान टेकडी) गणपतीची उपासना केली. त्यावर गणपतीने प्रसन्न होऊन सिद्धी प्रदान केली. त्या सहाय्याने विष्णूने मधु कैटभ राक्षसांचा वध केला. सिद्धी देणारा म्हणुन सिद्धिविनायक असे नाव ह्या गणपतीला पडले.

अष्टविनायकातला हा एकमेव गणपती उजव्या सोंडेचा आहे. हा गणपती नगर जिल्ह्यात आहे.

इथे सुद्धा एक दैदिप्यमान इतिहास घडलेला आहे.

पेशव्यांचे सेनापती हरिपंत फडके ह्या गणपतीचे निस्सिम भक्त होते. एकदा त्यांना पेशव्यांनी कामावरून काढून टाकले. त्यावेळी ते सर्व सोडून सिद्धटेकला आले. ते रोज ह्या गणपतीला 21 प्रदक्षिणा घालत. असे 21 दिवस घडल्यावर गणपती प्रसन्न झाला आणि पेशव्यांचा दूत त्यांना बोलवायला सिद्धटेक येथे आला. त्यावेळी त्यांनी "*श्रीमंत जिथे स्वारी करायला पाठवतील तिथले दगड आणुन तुझ्यापुढे रस्ता बांधीन असा नवस केला*." त्यांना बदामाचा किल्ला जिंकायला पाठवले. त्यांनी तो किल्ला घेऊन तिथले दगड आणुन इथे रस्ता बांधला.

ह्या मंदिराचा प्रदक्षिणा मार्ग 1 किमी लांबीचा आहे. अख्या टेकालाच प्रदक्षिणा मारायला लागते.

पूर्वी ह्या मंदिरात जायला भीमा नदीतून नौकेने जायला लागायचे.आता तिथे पूल झाला आहे.

4)रांजणगाव महागणपती

तारकाक्ष, पद्माक्ष आणि विद्युनमाली अशा 3 असुरांना त्रिपुरासूर म्हटले जाते. ह्यांनी ब्रह्मदेवाला प्रसन्न करुन सोने,चांदी आणि लोह ह्यांची तिन आकाशगामी नगरे प्राप्त करून घेतली. त्याखेरीज असा वर मागितला की जेव्हा ही 3 पुरे कोणी एकाच बाणाने उध्वस्त करेल तरच त्यांचा वध होऊ शकेल. त्यानंतर ही पुरे वेगवेगळ्या दिशेत भ्रमण करत असत. तिथून मारा करून ह्यांनी त्रैलोक्याला त्रस्त केले. तेव्हा सर्व देव शंकराला शरण गेले. शंकराने त्या असुरांशी युद्ध सुरू केले. ते युद्ध 1000 वर्षे चालले तरीही असुरांचा पराभव होत नव्हता. त्यामुळे शंकराने गणपतीची उपासना केली. तेव्हा गणपतीने दहा सोंडा आणि वीस हात अशा भव्य रूपात शंकराला दर्शन दिले. आणि बीजमंत्र दिला. त्याच्या सहाय्याने शंकराने कार्तिक पौर्णिमेला एक बाण सोडुन त्या असुरांचा त्यांच्या तिन्ही पुरसह विध्वंस केला. त्यामुळे ती पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते.

मोठ्या भव्य रूपात प्रकट झाल्याने ह्या गणपतीला महागणपती म्हटले जाते.

हे मंदिर पुणे जिल्ह्यात रांजणगाव येथे आहे.

5) ओझर विघ्नेश्वर

विघ्नासुर नावाचा एक राक्षस अभिनंदन राजाच्या यज्ञात विघ्न आणायला उत्पन्न झाला. तो यज्ञ उध्वस्त केल्यावर त्याने त्रैलोक्यात धुमाकुळ घालायला सुरुवात केली. तेव्हा गणपतीने त्याच्याशी युद्ध केले आणि त्याचा वध केला.*मरण्यापूर्वी राक्षसाने ह्या घटनेची स्मृती म्हणुन तुझ्या नावाच्या आधी माझं नाव घेतलं जावं असा वर मागितला.*

ह्या मूळ हा गणपती विघ्नहर किंवा विघ्नेश्वर म्हणुन ओळखला जातो.

हा गणपती पुणे जिल्ह्यात आहे.

इथेच एक जगप्रसिद्ध वैज्ञानिक गोष्ट आहे.आपल्याला लाल ते जांभळा असा 400 ते 700 नॅनो मीटर मर्यादेत असलेला प्रकाशच डोळ्यांना दिसू शकतो.त्याच्यापुढे अवरक्त आणि अतिनील किरणं असतात. त्यांच्याही पलीकडे मीटर वेव्हस असतात.ज्या कधीही डोळ्यांना दिसू शकत नाहीत.त्यांचा अभ्यास करण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या दुर्बिणी लागतात.ह्यांना मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कॉप असे म्हटले जाते.अशा प्रकारच्या दुर्बिणींचे जगातले सगळ्यात मोठे जाळे ह्या भागात पसरलेले आहे.ज्याला ओझर जीएमआरटी म्हणुन ओळखले जाते.ह्याची दोन युनिट आपल्याला मंदिर परिसरातून दिसतात.

हे मंदिर कुकडी नदीच्या काठावर वसलेलं आहे.

6)लेण्याद्री गिरिजात्मक

गणेश पुराणात गणपती हा आदिदेव म्हणुन पूजला जातो. गणपती आपला पुत्र व्हावा यासाठी पार्वती मातेने इथे तपस्या केली. त्यामुळे प्रसन्न होऊन गणपतीने तिला एका बटू च्या रुपात दर्शन दिले आणि इच्छित वर दिला.

गिरिजेचा(पार्वती) मुलगा म्हणून ह्याला गिरिजात्मक किंवा गिरिजात्मज असे नाव पडले

ह्या स्थळाच नाव लेण्याद्री पडण्याचं कारण इथे डोंगरात खोदलेल्या लेण्या आहेत.

मुख्य मंदिरातून समोर पहिले तर समोर शिवनेरी किल्ला दिसतो. जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता.

हा गणपती पुणे जिल्ह्यात आहे.

7) महड वरदविनायक

गृत्समद ऋषींची माता मुकुंदा हिला दोष होता. तो दूर करण्यासाठी त्यांनी गणपतीची भक्ती केली. त्यांच्या तपस्येवर प्रसन्न होऊन गणपती प्रकट झाला आणि त्यांना इच्छित वर दिला.*वर देणारा म्हणुन ह्या गणपतीच नाव वरदविनायक असं पडलं आहे.*

ह्या गणपतीचं वैशिष्ट्य आहे की ह्याच्या थेट गाभाऱ्यात आतपर्यंत जाऊन दर्शन घेता येतं.

हा गणपती अजुन एक गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे.*जर कोणाला मुलबाळ होत नसेल आणि इथे येऊन नवस केला तर पुत्रप्राप्ती होते* अशी ह्याची ख्याती आहे.

त्यामुळे चतुर्थीला इथे भाविकांची वर्दळ असते.

हा गणपती रायगड जिल्ह्यात आहे.

8)पाली बल्लाळेश्वर

प्राचीन काळी कल्याण नावाचे शेटजी इथे व्यापार करत होते. त्यांना बल्लाळ नावाचा एक मुलगा होता. तो मोठा गणेशभक्त होता. तो गावभरच्या मुलांना जमवुन पूजन करत बसायचा. त्यामुळे त्या सर्वांच व्यवहारा कडे दुर्लक्ष होत असे. त्यामुळे सगळ्या गावकऱ्यांनी शेठजींकडे तक्रार केली. त्यावर संतप्त शेठजी बल्लाळ जिथे पूजा करत होता तिकडे गेले. त्याची पूजा उधळून लावली आणि मूर्ती फेकून दिली आणि त्याला बेदम मारून एका शिळेला बांधुन ठेवले. त्यावर त्याने गणपतीचा धावा केला. गणपती प्रसन्न झाला आणि त्याने बल्लाळाची सुटका केली.बल्लाळाने गणेशाला तिथे वास्तव्य करण्याची विनंती केली त्यावर प्रसन्न होऊन गणपतीने तिथे मूर्तीरूपाने वास्तव्य केलं. बल्लाळाला प्रसन्न झाला म्हणुन त्याच नाव बल्लाळेश्वर पडलं.

बल्लाळाने पुजलेली मूळ मूर्ती धुंडीविनायक म्हणुन ओळखली जाते.बल्लाळेश्वराच्या आधी धुंडीविनायकाच दर्शन घेतलं जातं.

हा गणपती रायगड जिल्ह्यात आहे.

चिमाजी अप्पांनी वसईच्या किल्ल्यातून जिंकुन आणलेल्या घंटांपैकी एक घंटा ह्या गणपती मंदिरात आहे.

भीमा नदीवर पूल झाल्याने वेळ वाचुन काही अधिक स्थळे पाहता येतात.त्यापैकी प्रमुख

9)जेजुरी खंडोबा

हा शंकराचा अवतार आहे.*मणी आणि मल्ल* अश्या दोन राक्षसांनी संपूर्ण जगात धर्माचा विध्वंस सुरू केला तेव्हा शंकराने त्यांचा वध करायला अवतार घेतला.*मल्ल राक्षसाला मारले म्हणुन त्याचे नाव मल्लारी* असे पडले.

शंकराच शस्त्र शूल आणि वाहन नंदी आहे. पण ह्या अवतारात त्याने तलवार किंवा खड्ग हत्यार वापरले होते. खड्गाला बोलीभाषेत खंडा म्हणतात.खंडा वापरतो म्हणुन खंडोबा असे नाव पडले.

मराठेशाहीतील सुप्रसिद्ध अशा होळकर घराण्याचे हे कुलदैवत आहे.

10) प्रति बालाजी नारायणपूर

वेंकीज चिकनचे मालक श्री वेंकटेश्वर राव ह्यांना तिरुपती बालाजी ह्याने स्वप्नात दृष्टांत दिला आणि माझं मंदिर बांध अशी सूचना केली. त्याला अनुसरून त्यांनी नारायणपूर च्या जवळ जागा घेऊन तिरुपती मंदिराची प्रतिकृती असलेल मंदिर बांधल. तेच प्रति बालाजी.

ह्याचाच मार्गावर जाताना मध्ये नारायणपूर एकमुखी दत्त मंदिर , नारायणेश्वर शिव मंदिर आणि चांगदेव वट सिद्धेश्वर मंदिर अशी देवळे देखील आहेत.

2) थेऊर चिंतामणी

पूर्वी कपिल नावाचे एक थोर ऋषी होते. त्यांनी तपस्या करून एक मणी प्राप्त केला होता. जो सगळ्या इच्छा पूर्ण करायचा. त्यामुळे त्याला चिंतामणी असे नाव होते. एकदा कण नावाचा एक राजा त्यांच्या आश्रमात आला होता. ऋषींनी त्याच उत्तम आदरातिथ्य केलं. तेव्हा राजाने त्यांना विचारले की हे कस काय शक्य झालं. तेव्हा त्यांनी मण्याची गोष्ट सांगितली. राजाने तो मणी हिसकावून आपल्या राज्यात नेला. त्यावर कपिल मुनींनी गणपतीचे स्मरण केलं. तेव्हा गणपतीने त्या राजाशी युद्ध करून त्याला ठार मारले आणि मणी परत आणुन दिला. तेव्हा कपिल मुनींनी तो मणी त्याच्याच गळ्यात बांधला आणि त्याला इथे भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी वास्तव्य करायची विनंती केली. त्यावर गणपतीने हा अवतार घेतला. त्याच नाव चिंतामणी आहे.

इथे एक ऐतिहासिक घटना घडलेली आहे.

थोरले माधवराव पेशवे हे थेऊरच्या चिंतामणीचे निस्सिम भक्त होते. जेव्हा त्यांचा क्षय रोग विकोपाला गेला तेव्हा त्यांनी ह्याच गणपतीच्या आवारात वास्तव्य केलं आणि इथेच अखेरचा श्वास घेतला.त्यांचं स्मारक ह्या मंदिरात आहे.

त्या खेरीज इथे अजुन एक ऐतिहासिक वस्तू आहे. पेशव्यांचे भाऊ चिमाजी अप्पा ह्यांनी जेव्हा वसईचा किल्ला जिंकला त्यावेळी तिथल्या चर्च च्या घंटा ट्रॉफी म्हणुन बरोबर घेतल्या होत्या. त्यापैकी एक घंटा ह्या मंदिराच्या आवारात बांधलेली आहे.

हा गणपती पुणे जिल्ह्यात आहे.